केज :- केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायती अंतर्गत दुर्गम डोंगरी भागात असलेल्या तांदळेवस्तीवर पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने वयोवृद्ध, मुलांची घागरभर पाण्यासाठी भटकंती आणि गुरांना चारा-पाणी नसल्याने उपासमार सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित होताच उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी दखल घेतली. त्यांनी तहसीलदार आणि बीडीओ यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार दि. २६ नोव्हेंबर, गुरुवार रोजी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी या वस्तीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत तात्काळ टँकर सुरू करण्याचा अहवाल टंचाई विभागाकडे सादर केला आहे.
बीड जिल्ह्यातील तरनळी ता. केज पासून सुमारे अडीच कि. मी. अंतरावर तांदळेवस्ती असून २५ ते ३० कुटुंबे आणि दीडशे लोकसंख्या आहे. चोहो बाजूंनी डोंगराळ भागात वसलेल्या वस्तीला कुठल्याही प्रकारची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित नसून केवळ बोअर आणि एका विहिरीवर तहान भागविली जात होती. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून पाणी काढून डोंगर चढण्याची कसरत करावी लागते. मात्र यंदा अवर्षणामुळे जमिनीतील पाणी पातळी खाली गेली आहे त्यामुळे विहिर आटली आहे. आता विहीर आटली असून बोअर सुद्धा कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचे कुठल्याही प्रकारचे स्रोत शिल्लक राहिले नाहीत. त्यात वस्तीवरील सर्व घरातील कर्ते व्यक्ती हे उसतोडणीसाठी बाहेर जिल्ह्यासह परराज्यात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे वस्तीवर असलेल्या वयोवृद्ध आणि शाळकरी मुलांना घागरभर पाण्यासाठी डोंगर पालथा घालावा लागतो. मात्र पाणी कुठे मिळत नसल्याने घशाला कोरड पडली आहे. तर गुरे हे चारा आणि पाणी नसल्याने उपासमार सुरू आहे.
दरम्यान, उसतोडणीस परराज्यात गेलेल्या मारुती बळीराम तांदळे या मजुराने गावी येऊन ऊस तोडणी करून येणाऱ्या मजुरीचे घामाचे २० हजार रुपये खर्चून तीन टँकर पाणी विकत घेत तात्पुरती गुरांची आणि कुटुंबासाठी पाण्याची सोय केली. अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली असताना ग्रामपंचायती कडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नव्हत्या. तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे या वस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी कोण देणार ? असे सांगताना वयोवृद्ध महिला, नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
या तांदळेवस्ती वरील विदारक परिस्थितीचे वृत्त प्रकाशित झाल्या नंतर अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार अशोक भंडारे आणि गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना तात्काळ पाहणी करून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
त्या नुसार गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशा वरून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विलास कदम यांनी गुरुवारी प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन पाहणी केली. सर्व स्रोत बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ अहवाल तयार करून टँकर सुरू करण्याचा अभिप्राय दिला आहे.
तर अहवाल प्राप्त होताच टँकर सुरू केले जाईल, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी सांगितले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!