धारूर : बालाघाटाच्या डोंगरकुशीत वसलेल्या घागरवाडा येथे रविवारी रात्री बिबट्याने शेतातील गायीवर हल्ला करून तिला ठार केले. शेतकरी बन्सी पांडुरंग नाईकवाडे यांच्या शेतात ही घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, ज्यात बिबट्यानेच हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी संबंधित शेतात तातडीने ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला आहे.
यापूर्वी भायजळी रस्त्यावर रात्री बिबट्या आढळला होता, मात्र दिवसा काढण्यात आलेला फोटो चुकीचा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावरील छायाचित्रांची खात्री करावी, शेतकऱ्यांनी रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी ईश्वर गुनावत यांनी केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!