अंबाजोगाई (जि. बीड): साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि इतर उद्योगधंद्यांना ज्याप्रमाणे शासन 'थकहमी' घेऊन कर्ज उपलब्ध करून देते, त्याच धर्तीवर राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधन आणि फळबागा वाचविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जाची थकहमी घ्यावी. या माध्यमातून शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने शेतीकर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भारतीय किसान संघ परिसंघ (नवी दिल्ली) चे सचिव कालिदास आपेट यांनी केली आहे.
पीककर्ज रखडल्याने शेतकरी अडचणीत
अंबाजोगाई येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कालिदास आपेट यांनी म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची नीट अंमलबजावणी न झाल्यामुळे अद्याप पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यातच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी आणि सहकारी बँकांसह पतपेढ्या रब्बी हंगामासाठीही पीककर्ज देण्यास तयार नाहीत. दुसरीकडे दुष्काळामुळे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह, मासे व कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चारा, पाणी आणि खुराकासाठी पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीने थकहमीवर कर्ज द्यावे.
फळबागा आणि दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर
शेतीमालावरील निर्यातबंदीच्या धोरणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि आंबा, द्राक्ष, काजू, ड्रॅगनफ्रूट, पेरू, जांभूळ, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सीताफळ यांसारख्या फळबागांकडे वळला आहे. सध्या पाण्याअभावी या फळबागा डोळ्यांसमोर जळत आहेत. तसेच, मागील ५० वर्षांत धरणे, तलाव, विहिरी, शेततळे आणि जलयुक्त शिवारमधून निर्माण झालेले जलसाठे सध्या पूर्णतः दूषित झाले आहेत. या दूषित जलसाठ्यांमधून सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे दुष्काळी काळात आरओ (RO) प्लांट चालकांना आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी शासनाने मदतीचे आवाहन करावे.
शेतकऱ्यांना बाजारापासून दूर ठेवू नका
शहरी भागातील पशुपालकांना अद्याप चारा-पाण्याची मोठी टंचाई जाणवलेली नाही. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ मागील दुष्काळातील उपाययोजनांची चाचपणी करत चारा व पाण्याचे बाजार नियंत्रित करत आहेत. शेतकऱ्यांना बाजारापासून दूर ठेवून जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था होणार नाही. शासनाने थकहमीवर मुबलक कर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकरी स्वतःच्या हिमतीवर पशुधन आणि फळबागा जगवू शकतील, असा विश्वासही आपेट यांनी व्यक्त केला आहे.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!