केज - थोर संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चापोली ते कपिलधार पदयात्रेचे सोमवारी सकाळी मस्साजोग येथे आगमन होताच दिंडीतील एका महिला भक्ताला अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याने वारकऱ्यांनी केज-मांजरसुंबा महामार्गावर रास्ता रोको केला. या घटनेमुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वारकऱ्यांची समजूत काढून संबंधित वाहनचालकावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
गेल्या ७२ वर्षांपासून चापोली ते कपिलधार अशी अखंडपणे पायी दिंडी काढण्यात येते. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कपिलधार येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दिंड्यांमध्ये थोर संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची दिंडी सर्वात मोठी मानली जाते. या दिंडीत सुमारे ६० ते ७० हजार शिवभक्त आणि एक हजार वाहनांचा ताफा सहभागी असतो. रविवारी रात्री दिंडीचा मुक्काम केज येथे होता. सोमवारी सकाळी मस्साजोग येथे दिंडीचे आगमन झाले. यावेळी दिंडीतील एका महिला भक्ताला अज्ञात वाहनाचा धक्का लागल्याची घटना घडली. यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी महामार्गावर ठिय्या देत रास्ता रोको केला. परिणामी केज-मांजरसुंबा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी महेश शिरसागर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलक भाविकांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. संबंधित अज्ञात वाहनचालकावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर वारकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेतला. त्यानंतर दीड तास ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत करण्यास पोलिसांना यश आले.
मस्साजोगमध्ये प्रवचन सोहळा
वाहतूक सुरळीत झाल्यानंतर संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या जयघोषात मस्साजोग येथे प्रवचन सोहळा पार पडला. युवा संत राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, सोमलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ काशी, माता उमरी संगम बस महाराज निलंगेकर यांच्यासह हजारो महिला व पुरुष भक्त दिंडीत सहभागी झाले होते. चापोली, चाकूर, वडवळ, जानवळ, पानगाव, घाटनांदूर, पूस, अंबाजोगाई, होळ, चंदनसावरगाव, केज, मस्साजोग, नेकनूर आणि मांजरसुंबा मार्गे ही दिंडी कपिलधारकडे मार्गस्थ होते. दिंडीतील शिवभक्तांसाठी प्रत्येक गावात सामाजिक संस्था, वीरशैव बांधव आणि ग्रामस्थांकडून चहा, फराळ व भोजनाची व्यवस्था केली जाते. मस्साजोग येथे चहा-नाश्ता घेतल्यानंतर दिंडी कपिलधारच्या दिशेने रवाना झाली.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!