केज:- केज-बीड महामार्गावरील गट क्र. ३०/२ मधील गायरान जमिनीपैकी २० गुंठे जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित करून तातडीने मंजूरी देण्याची मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
दि. २३ नोव्हेंबर रोजी कृती समितीच्या वतीने नगर पंचायत केजचे मुख्याधिकारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केज शहरातील केज-बीड रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक ३०/२ मधील गायरान जमिनीपैकी २० गुंठे जागा माता रमाई बौद्ध विहारासाठी आरक्षित करण्यात यावी. ही मागणी मागील तब्बल १५ वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, एवढा प्रदीर्घ कालावधी उलटूनही नगरपंचायत प्रशासनाकडून या मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. ही बाब अत्यंत खेदजनक असून बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना, सामाजिक अस्मिता आणि न्याय्य हक्कांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आहे.
सदर जागेवर अनेक वर्षां पासून जगाला शांती, समता, बंधुता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक पौर्णिमेला तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केज शहरासह संपूर्ण तालुक्यातील बौद्ध अनुयायी या ठिकाणी एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे या जागेला बौद्ध समाजाच्या दृष्टीने विशेष धार्मिक, ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.
या ठिकाणी त्याग, संघर्ष, स्वाभिमान आणि समतेचे प्रतीक असलेल्या माता रमाई यांच्या नावाने भव्य बौद्ध विहार उभारण्याची समाजाची संकल्पना आहे. या विहाराच्या माध्यमातून धार्मिक उपासनेबरोबरच सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उपक्रम, संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि नव्या पिढीला महामानवांच्या विचारांची प्रेरणा देण्याचे कार्य केले जाणार आहे. मात्र, गेल्या १५ वर्षां पासून वारंवार मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न करणे म्हणजे समाजाच्या रास्त मागणीला जाणीवपूर्वक विलंब लावण्यासारखे आहे. केवळ आश्वासने देऊन समाजाच्या भावनांशी खेळण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून जागा आरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
जर याची दखल घेतली गेली नाही तर कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. निवेदनावर दिपक कांबळे, अजय भांगे, दिलीप बनसोडे, गौतम बचुटे, रणधीर ठोकेमिलींद गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिल्या आहेत.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!