बीड | श्रीमंत आणि राजकीय घराण्यांतील तरुणांच्या बेदरकार वाहन चालवण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची एक अत्यंत संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीडच्या माजलगाव येथे भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कारची शर्यत (रेस) लावून दुचाकीवरील पती-पत्नीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेचे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

बीडच्या माजलगावमध्ये कार रेसिंगचा थरार; दाम्पत्याला 100 ते 150 फूट फरफटत नेले बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गढी रोडवर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे. प्रल्हाद गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुनीता गायकवाड हे दोघे आपल्या दुचाकीवरून गढी रोडवरील पेट्रोल पंपाजवळून जात होते. त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की गायकवाड दाम्पत्य हवेत उंच उडून खाली रस्त्यावर कोसळले आणि दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला.

कार रेसिंगच्या नादात निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील भाजप नगरसेवकाचा अल्पवयीन मुलगा ही कार चालवत होता. त्यावेळी 2 मित्रांमध्ये गाड्यांची जीवघेणी शर्यत (कार रेस) सुरू होती. या शर्यतीच्या नादात कारचालकाने गायकवाड दाम्पत्याला सुमारे 100 ते 150 फूट फरफटत नेले.

उपचारापूर्वीच मृत्यू व गुन्हा दाखल या अपघातात प्रल्हाद गायकवाड यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सुनीता गायकवाड यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गायकवाड दाम्पत्याच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवकाच्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार रेसिंगच्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.