बीड ते गेवराई राष्ट्रीय महामार्गावरील इटकूर फाट्याजवळ एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एका ४४ वर्षीय महिलेला आपला डावा हात कायमचा गमवावा लागला आहे. अपघातात ट्रॅव्हल्सची दोन्ही चाके हातावरून गेल्याने डॉक्टरांना तिचा हात कोपरापासून कट करावा लागला आहे. १२ जून रोजी सकाळी नऊ वाजता जानकी पोल्ट्री फार्मजवळ घडलेल्या या हृदयद्रावक घटनेप्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
बीड येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या कांता प्रकाश पवार (वय ४४) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून (MH 23 AV 7619) रामनगर तांडा येथे जात होत्या. इटकूर फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या 'जहा विजय ट्रॅव्हल्स' या खाजगी बसने (AR 01 P 7827) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने पवार दाम्पत्य रस्त्यावर कोसळले आणि दुर्दैवाने बसचे पुढचे व मागचे असे दोन्ही टायर कांता पवार यांच्या डाव्या हातावरून गेले. यात त्यांचा हात पूर्णपणे निकामी झाल्याने कोपरापासून कापावा लागला. बीडच्या जीवन ज्योत रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा नोंदवला असून सहाय्यक फौजदार जायभाये तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!