बीड - केवळ वर्गात पहिला येणारा विद्यार्थीच आयएएस होऊ शकतो, ही संकल्पना चुकीची आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन गुणांपेक्षा नियोजनबद्ध अभ्यास आणि स्मार्ट वर्कच्या जोरावर कोणीही यूपीएससी परीक्षेत यश मिळवू शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कलेक्टरांशी गप्पा या उपक्रमाच्या पाचव्या सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केज तालुक्यातील उमरी, तांबवा, युसूफवडगाव, भाटूंबा, नाहोली आणि शिंदी या सहा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इघारे, ‍गिरीश मोहेकर यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे शालेय जीवन, आवडता विषय आणि यूपीएससीच्या प्रवासाबाबत विविध प्रश्न विचारले. यावर बोलताना विवेक जॉन्सन म्हणाले, माझ्या आई-वडिलांचे मला जिल्हाधिकारी बनविण्याचे स्वप्न होते, मात्र अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनात मी तासन्‌तास अभ्यास करत नव्हतो, पण यूपीएससीच्या तयारीसाठी सलग तीन वर्षे दररोज पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत कठोर परिश्रम घेतले. समाजशास्त्र हा माझा आवडता विषय होता आणि त्यात मला पैकीच्या पैकी गुण मिळायचे. प्रशिक्षण काळात आपण मराठी शिकलो असून, आजही ती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सैराट, देऊळ आणि नटसम्राट हे मराठी चित्रपट आवडीने पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

शालेय जीवनात मी बास्केटबॉल आणि फुटबॉल उत्तम खेळायचो, तर सध्या बॅडमिंटन खेळतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच एखादा खेळ आणि कला जोपासली पाहिजे, त्यातून टास्क मॅनेजमेंट शिकता येते, असे ते म्हणाले. आपल्या वडिलांची शिकवण सांगताना ते भावूक झाले, कार्यालयात समस्या घेऊन येणारा प्रत्येक अभ्यागत हा आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य किंवा आपला मित्रच  आहे, असे समजून त्याचे काम करावे, या तत्त्वावर मी काम करत असतो. मुलांनो, आयुष्यात माणुसकी कायम जपा आणि आपल्या गावाप्रती दायित्व ठेवा, असा संदेश त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी श्री.जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या शाळेतील मैदान, शौचालय, शिक्षक आणि इतर सुविधाबाबत आस्थेने चौकशी केली. आगामी काळात 100 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना क्रीडांगण उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व पाण्याची सोय करण्यात आली असून जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी माझ्या विद्यार्थी जीवनात कधीही जिल्हाधिकारी कार्यालय पाहिले नव्हते. तुम्ही आज येथे आला आहात, याचा आनंद आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनी ती पाहण्यासाठी अवश्य यावे, असे प्रेमळ निमंत्रण जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना दिले.

कोणत्याही समाजाच्या विकासाचे मोजमाप हे तेथील महिलांच्या परिस्थितीवरून केले जाते. बीड जिल्ह्यात बालविवाह रोखले गेले आणि महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले, तर जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास शक्य आहे. यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. तरी यात आपला सहभागही अत्यंत महत्वाचा आहे, असे सांगून त्यांनी आजची ही पिढीच उद्याचे बीड घडवेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.