बीड : जिल्ह्यात तीव्र दुष्काळ, पाणीटंचाई, करपलेली पिके आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, अवघ्या २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील सिरसमार्गजवळील भंडगवाडी येथील ५६ वर्षीय शेतकरी बाबुराव रंगनाथ वाघमोडे यांनी मंगळवारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असून, विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने आणि हाताला काम नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना ऊसतोडीसाठी स्थलांतर करावे लागत आहे.

दुष्काळी उपाययोजनांच्या केवळ घोषणा व बैठका होत असून, प्रत्यक्ष गावपातळीवर पाणी, चारा आणि आर्थिक मदत वेळेत पोहोचत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच शासकीय निधी व धान्य वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. आत्महत्येनंतर पंचनामे करण्याऐवजी जिवंतपणीच शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून, नागरिकांच्या तक्रारींबाबत प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.