बीड: रेशीम उत्पादनाला वस्त्रोद्योगाची जोड देऊन जिल्ह्यातच आकर्षक सिल्क साड्यांची निर्मिती केली जाईल आणि आगामी ९ ते १० वर्षांत राज्याच्या नकाशावर जिल्ह्याची ओळख 'सिल्क बीड' म्हणून निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला. बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी वेदभवन येथे जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने केंद्र शासनाच्या 'सिल्क समग्र-२' योजनेंतर्गत आयोजित निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
जालना जिल्ह्याच्या धर्तीवर बीडमध्येही वस्त्रोद्योग प्रकल्प उभारून रेशीम धाग्यापासून येथेच साड्यांची निर्मिती व्हावी, अशी संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. पोखरा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांमध्ये रेशीम उत्पादन, तुती व फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. रेशीम उत्पादनापासून ते साडी निर्मितीपर्यंतची संपूर्ण साखळी जिल्ह्यात विकसित झाल्यास स्थानिक स्तरावर, विशेषतः महिलांना शिवणकाम आणि वस्त्रनिर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सांगतानाच त्यांनी शाश्वत शेतीसाठी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनावर भर देण्याची गरजही व्यक्त केली.
प्रशासकीय सहकार्य आणि तांत्रिक प्रशिक्षणाची ग्वाही
या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी 'व्हीबी-जी-राम-जी' योजनेतून रेशीम शेतीला बळ देण्याची ग्वाही दिली, तर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी शंकर वराट यांनी दुष्काळी परिस्थितीत तुती संगोपनाचे तंत्रज्ञान, पाच दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण आणि ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील अंडीपुंज केंद्रावर होणाऱ्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याची माहिती दिली. यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी गर्जे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!