अंबाजोगाई : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे आजच्या राजकारण्यांपेक्षा शंभर पट मोठ्या उंचीचे नेते होते आणि त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायमूर्ती प्रकाश परांजपे यांनी केले. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय स्मृती समारोहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यशवंतराव चव्हाण यांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेले 'सह्याद्रीचे वारे' हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे, असे आवाहनही न्या. परांजपे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे सचिव दगडू लोमटे यांच्यासह यंदाचे पुरस्कार मानकरी उपस्थित होते. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी पद्मश्री श्रीरंग दादा लाड (परभणी), साहित्यासाठी श्रद्धा बेलसरे-खारकर (अंबाजोगाई), संगीतासाठी पं. गंगाधर देव (नांदेड) आणि संगीत युवा गौरव पुरस्कारासाठी तरुण गायिका कु. नंदिनी व कु. अंजली गायकवाड (तांदुळजा, ह.मु. पुणे) यांचा समावेश होता. तसेच, महाराष्ट्र शासनाचा वाचन प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित जोंधळे यांचा न्या. परांजपे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

पुरस्कारार्थींची मनोगते सत्काराला उत्तर देताना पद्मश्री दादा लाड यांनी कापूस पिकावरील संशोधनाची माहिती देत शासकीय अनास्थेबद्दल खंत व्यक्त केली. साहित्य क्षेत्रात नकारात्मक स्त्री चित्रणाऐवजी सकारात्मक लिखाण होणे गरजेचे असल्याचे मत श्रद्धा बेलसरे-खारकर यांनी मांडले. तर पं. गंगाधर देव यांनी आपला पुरस्कार वडील व गुरू गोविंदराव पटवर्धन यांना समर्पित केला आणि गायकवाड भगिनींनी हा पुरस्कार पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव दगडू लोमटे यांनी केले, ज्यात त्यांनी ४१ वर्षांपूर्वी स्व. भगवानराव लोमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेल्या या रोपट्याचा प्रवास उलगडला. उपाध्यक्ष सतीश लोमटे यांनी अतिथींचे स्वागत केले, डॉ. कमलाकर कांबळे यांनी परिचय करून दिला, तर परमेश्वर गित्ते, प्रा. सौ. भोसले आणि प्रा. सौ. लोमटे यांनी सूत्रसंचालन केले.