शिरूर कासार: तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एका व्यक्तीने शेतकऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत घराशेजारील शेड पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. या आगीत शेती व इतर साहित्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटशिळ पारगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी रघुनाथ नाना खेडकर (वय ६५) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. २० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास खेडकर हे आपल्या राहत्या घरी असताना, ढाकणवाडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील आरोपी अंबादास जालिंदर ढाकणे हा चारचाकी वाहनातून त्यांच्या घरी आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याने खेडकर यांना शिवीगाळ केली आणि पेट्रोल टाकून जाळून खतम करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने घराशेजारील शेडवर पेट्रोल ओतून आग लावली. या शेडमध्ये ठेवलेले पीव्हीसी पाईप, स्टार्टर, फॅन आणि ऑक्सिजन मशीन जळून खाक झाले. यात फिर्यादीचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर रघुनाथ खेडकर यांनी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अंबादास ढाकणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२६ (फ), ३२४ (५), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरवसे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!