बीड : जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, रस्ते आणि रेल्वे सुरक्षेच्या प्रश्नांना गती देण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांच्या सूचनेनुसार सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा', रेल्वे सुरक्षा आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडता यावेत, यासाठी खासदारांच्या संपर्क कार्यालयाकडून ९४७७१६१६१६ हा विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करून तक्रारी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खा. सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या तिन्ही बैठकांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभागाच्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहितीसह बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची सद्यस्थिती, सुरू असलेल्या कामांची प्रगती तसेच केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या रेल्वे व रस्ता सुरक्षा प्रस्तावांचा सखोल आढावा घेतला जाणार असून अपघात रोखण्याच्या उपाययोजना आणि विकासकामांतील अडथळे दूर करण्यावर भर राहणार आहे.
नागरिकांना तक्रारी पाठविण्याचे आवाहन
'आपल्या समस्या, आमचा पाठपुरावा' या भूमिकेतून खासदार संपर्क कार्यालयाने नागरिकांना साद घातली आहे. आपल्या भागातील रस्ते, वाहतूक कोंडी, रेल्वे सुरक्षा किंवा इतर विकासकामांबाबत तक्रारी अथवा सूचना असल्यास नागरिकांनी लेखी निवेदन व आवश्यक कागदपत्रांसह ९४७७१६१६१६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. हे सर्व प्रश्न संबंधित बैठकीत मांडून त्यावर ठोस कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आवाहन संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
बैठकांचे वेळापत्रक (सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६)
जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर चालणाऱ्या या सत्रामध्ये सकाळी ११.०० वाजता जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक, दुपारी ३.३० वाजता रेल्वे सुरक्षा समिती बैठक आणि दुपारी ४.३० वाजता जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!