केज : मोबाईलवर बोलत भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले आहेत. केज-कळंब रोडवरील कासारी पाटीजवळ गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथील रहिवासी राजू बबन जमदाडे आणि त्यांच्या पत्नी उमा राजू जमदाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून नातेवाईकाचे अंत्यविधी आटोपून आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच ४२/बीव्ही ७९१८) गावी परतत होते. केजजवळील कासारी पाटीजवळ आले असता, समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील (क्र. एमएच ४४/वाय ८५२८) चालकाने मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे वाहन चालवून जमदाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात जमदाडे पती-पत्नी रस्त्यावर पडून जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी राजू जमदाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम १२५(ए), १२५(बी) आणि २८१ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे पुढील तपास करत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!