बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या नातेवाईकांवर लोखंडी पाईप, चाकू आणि काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही खळबळजनक घटना २ नोव्हेंबरच्या सकाळी आरोपींच्या घरासमोर घडली असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी असलेला शुभम राजू पवार हा तरुण त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी नेकनूर येथे आला होता. त्यावेळी आरोपी उमेश साळुंके, बालाजी साळुंके, नितीन साळुंके आणि सुनील साळुंके यांनी संगनमत करून शुभमला शिवीगाळ सुरू केली. नितीनने शुभमच्या डाव्या हातावर लोखंडी पाईप मारला, तर सुनीलने त्याच्या डोक्यात काठीने वार केले. या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ईश्वर नावाच्या साक्षीदाराच्या पोटात उमेशने चाकू खुपसून जखमी केले, तर बालाजीने त्याला मोटरच्या बेल्टने बेदम मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी निर्मला पवार या आल्या असता बालाजीने त्यांचे डोके धरून थेट बाजूच्या सिमेंटच्या खांबावर आपटले आणि त्यांना गंभीर जखमी केले. सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, पुन्हा आमच्या नादी लागल्यास तुमचे मुडदेच पाडू, अशी भयंकर धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी नेकनूर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.