अंबाजोगाई: दिवाळी सणासाठी बहिणीला आणण्यासाठी गेलेल्या भावाला बहिणीच्या दिराने आणि त्याच्या पत्नीने शिवीगाळ करत विटेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे घडली. या मारहाणीत भाऊ जखमी झाला असून, पुन्हा गावात आल्यास तलवारीने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

फिर्यादी अशोक मुंजाभाऊ कटारे (वय २७, रा. दिंद्रूड, ता. माजलगाव) हे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लोखंडी सावरगाव येथे आपल्या बहिणीला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते बहिणीच्या घरासमोर उभे असताना आरोपी संतोष दत्तात्रेय जगताप आणि दिपाली संतोष जगताप (दोघे रा. लोखंडी सावरगाव) तेथे आले. त्यांनी अशोक यांना तू येथे का आलास, असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विनाकारण शिव्या का देता असे विचारले असता, संतोष जगताप याने अशोक यांच्या डोक्यात विटेने मारून दुखापत केली. तसेच पुन्हा आमच्या गावात आलास तर तलवारीने जीवे मारून टाकू, अशी गंभीर धमकीही दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.

जखमी अशोक कटारे यांनी अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष जगताप आणि दिपाली जगताप यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किसन घुळवे हे करीत आहेत.