गेवराई तालुक्यातील डोईफोडेवाडी येथे सामायिक शेतातील ऊस परस्पर नेल्याचा जाब विचारल्याने एका ३२ वर्षीय तरुणावर कुऱ्हाड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर नामदेव कोरडकर (रा. गोविंदवाडी) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. २७ ऑक्टोबरच्या सकाळी डोईफोडेवाडी येथे ही घटना घडली. ज्ञानेश्वर यांनी मला न विचारता शेतातील ऊस का नेला अशी विचारणा केली असता तुळशीराम वाघमोडे, अनिकेत वाघमोडे, संकेत वाघमोडे, गणेश वाघमोडे, बाबासाहेब रुपनर आणि वैजीनाथ वाघमोडे यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. या सर्वांनी संगनमत करून ज्ञानेश्वर यांच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर कुऱ्हाड व काठीने जोरदार मारहाण केली. दरम्यान अनिकेत वाघमोडे याने हातात दगड घेऊन तुझा आता गेमच करतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भांडणात मध्ये आलेल्या वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल (एमएलसी) प्राप्त झाल्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तलवडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.