अंबाजोगाई: येथील अपर पोलीस अधीक्षकपदी तरुण आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाच्या नव्या आदेशानुसार त्यांनी हा पदभार स्वीकारला असून, अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे अमली पदार्थ विरोधी अभियानाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे.
अनमोल मित्तल हे २०२१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारत गुन्हेगारी टोळ्यांवर मोठी वचक बसवली होती. पदभार घेताच धडक कारवाईचा धडाका लावल्याने ते अल्पावधीतच राज्यभरात चर्चेत आले होते.
अंबाजोगाईत नियुक्ती होण्यापूर्वी मित्तल हे ठाणे ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी गुन्हेगारी रोखण्यासोबतच सायबर गुन्ह्यांबाबत मोठी जनजागृती केली होती. आता या नव्या आणि तडफदार अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे अंबाजोगाई व परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!