दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव येथे अवघ्या तेरा वर्षे एक महिन्याच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार नवरदेव, त्याचे आई-वडील आणि मुलीच्या नातेवाइकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने बीड येथील चाईल्ड हेल्पलाइनच्या जिल्हा समन्वयकांकडे या बेकायदेशीर विवाहाची तक्रार केली होती. तक्रारीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास तेलगाव येथील एका घरात हा बालविवाह पार पडला.
या प्रकाराची गंभीर दखल घेत चाईल्ड हेल्पलाइनच्या आदेशावरून तेलगावच्या ग्रामपंचायत अधिकारी प्रणीता निमोणकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. तसेच, २० नोव्हेंबर रोजी पीडित मुलीला बीड येथील बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. समाजातील ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!