परळी तालुक्यातील दैठणाघाट शिवारात शेतीच्या वादातून आई आणि मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या भयंकर मारहाणीत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईलाही काठीने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी राम श्रीहरी गुट्टे (वय ४०) हे त्यांच्या शेतात (गट क्र. ५४) असताना शिवाजी श्रीपती गुट्टे, रुक्मिणबाई गंगाधर गुट्टे आणि गोविंद गंगाधर गुट्टे (सर्व रा. दैठणाघाट) यांनी तिथे येऊन वाद घातला. रागाच्या भरात आरोपींनी राम गुट्टे यांना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांच्या आईलाही काठीने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राम गुट्टे यांच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार वाले तपास करत आहेत.