बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे जनावरे शेतातून नेल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाड आणि लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी चार जणांवर केज पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश काशीनाथ चौरे (वय ४०, रा. जिवाचीवाडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मुलगा जनावरे घेऊन गावातीलच आरोपींच्या शेतातून आला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून सुदामती चौरे, राधाबाई चौरे, राजेभाऊ चौरे आणि संस्कार चौरे (सर्व रा. जिवाचीवाडी) यांनी त्यांच्या मुलाचा पाठलाग करत घरावर दगडफेक केली. त्यानंतर आरोपींनी प्रकाश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी राजेभाऊ याने लोखंडी गजाने प्रकाश यांच्या डोक्यात व हातावर वार केले, तर राधाबाई हिने कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला.
एवढेच नाही तर, हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही आरोपींनी गजाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या भयंकर प्रकारानंतर प्रकाश चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २६ ऑक्टोबर रोजी केज पोलिसांत सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आघाव करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!