बीड शहरातील साईनाथ नगर भागात चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघांनी एका २६ वर्षीय तरुणाला लोखंडी टॉमी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत अनिल चांदमारे असे या घटनेत जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. २५ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास विश्वजीत हे साईनाथ नगर येथील पोलीस रो हाऊसमध्ये असताना रोहन जाधव, गणेश गिरी आणि अमोल बारस्कर हे त्यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. यावेळी विश्वजीत यांनी प्रतिकार केला असता, या तिघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी काठी, लोखंडी टॉमी आणि लाथाबुक्क्यांनी विश्वजीत यांना अमानुष मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या भयंकर प्रकारानंतर विश्वजीत यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शिवाजीनगर पोलिसात तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार घरफोडी आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करत असून, भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.