केज: वाढत्या ऑक्टोबर हिटसोबतच मराठवाड्यातील दुष्काळी झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होऊ लागल्या असून, निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका फळभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाने तब्बल दोन ते सव्वा दोन महिने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली असून, पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने माळेगाव येथील एका शेतकऱ्याची दोन एकरांतील बहरलेली टोमॅटोची बाग डोळ्यांदेखत पूर्णपणे वाळून खाक झाली आहे.

कर्ज काढून उभी केलेली बाग मातीमोल

माळेगाव (ता. केज) येथील शेतकरी महादेव घाडगे यांनी मोठ्या उमेदीने दोन एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली होती. पूर्वमशागतीपासून नांगरणी, पाळी, शेणखत, बेसल डोस आणि मल्चिंग पेपर अंथरण्यावर त्यांनी मोठा खर्च केला. पीक जोमात आल्यानंतर बांबू, काठ्या आणि तारेच्या साहाय्याने रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने बांधणी केली. मात्र, ऐन फुलोऱ्यात आणि फळधारणेच्या काळातच पावसाने सलग ६० ते ७० दिवस दडी मारली. सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर त्यांनी पीक जगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र भूजल पातळी पार तळात गेल्याने अखेर झाडे वाळली. कर्ज काढून केलेला दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च आणि अहोरात्र घेतलेली मेहनत पूर्णपणे वाया गेल्याने घाडगे यांच्या हाताशी शून्य उरले आहे.

तोकड्या अनुदानाऐवजी भरीव मदतीची मागणी

खरीप हंगामात सोयाबीन, मूग, उडीद आणि कपाशी या पिकांचा पावसाअभावी आधीच कोळसा झाला असून, सोयाबीनच्या शेंगा दाणे भरण्यापूर्वीच पोकळ राहिल्या. अशा दुहेरी संकटात तरकारी आणि फळभाज्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांसाठी एकरी लाखो रुपयांचा खर्च येतो; परंतु शासनाकडून जाहीर होणारी दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असते. त्यामुळे किमान झालेला उत्पादन खर्च तरी भरून निघेल अशा स्वरूपात शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून दिली जात आहे.