केज तालुक्यातील बोरगाव येथे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या विलास बन या बोगस डॉक्टरवर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून कारवाई केली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार या भोंदू डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बोरगावमध्ये एक व्यक्ती बनावट प्रमाणपत्र लावून दवाखाना चालवत असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीवरून २७ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी विलास बन हा अधिकृत शिक्षणाविना रुग्णांना तपासत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, हा गंभीर प्रकार राजरोसपणे सुरू असताना स्थानिक पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच आणि आरोग्य कर्मचारी नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या डॉक्टरला औषधांचा पुरवठा कोण करत होते, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात असे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन डॉ. मुंडे यांनी केले आहे.