बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून पाण्याची मोटार, वायर आणि शेतमालासह तब्बल साठ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सुर्यभान आतकरे (वय ३५, रा. सांगवी सारणी) या तरुण शेतकऱ्याने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या शेतात असलेली पाण्याची पाणबुडी मोटार, जोडलेली पट्टी वायर आणि काढणी करून ठेवलेले वालाच्या शेंगाचे एक मोठे गाठोडे असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल २४ ऑक्टोबरच्या रात्री अकरा ते २५ ऑक्टोबरच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञातांनी चोरून नेला. सकाळी चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर आतकरे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

याप्रकरणी केज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार मुरकुटे हे करत आहेत. ऐन हंगामात शेतीसाठी लागणारी महत्त्वाची मोटार आणि वायर चोरीला गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ग्रामीण भागात वाढलेल्या या चोऱ्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.