केज: महावितरणच्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या भीषण आगीत केज तालुक्यातील नायगाव येथील तीन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत तोडणीला आलेल्या ऊसासह शेतातील ठिबक सिंचन संच पूर्णपणे भस्मसात झाले असून, दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

विद्युत तारांचे घर्षण अन् ठिणगीने भडका

नायगाव शिवारात शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या खांबांवरील सैल झालेल्या तारांचे एकमेकांना जोरदार घर्षण झाले. या घर्षणातून उडालेल्या ठिणग्या थेट ऊसाच्या फडात पडल्याने क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता या आगीत महारुद्र सखाहरी गुजर, नितीन श्रीहरी गुजर आणि सचिन नवनाथ गुजर या तिघांचा तोडणीवर आलेला सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की पिकांसोबत शेतात अंथरलेले ठिबकचे साहित्यही पूर्णपणे जळून नष्ट झाले. वर्षभर कष्ट करून पिकवलेला ऊस डोळ्यांदेखत राख झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महावितरणच्या कारभारावर संताप; भरपाईची मागणी

महावितरणच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे आणि लोंबकळणाऱ्या तारांची वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळेच हा अनर्थ घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांमधून होत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आधीच कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना झालेल्या या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.