पुणे : अंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्यात यावे, या मागणीसाठी रेल्वे सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे मंडल रेल्वे विभागाच्या बैठकीत २२ पानी सविस्तर प्रस्ताव सादर केला. पुणे मंडलाचे मंडल रेल्वे प्रबंधक (DRM) राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (Sr. DCM) अनिल पाठक यांच्यासह संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सुपूर्द करण्यात आला.
या सविस्तर प्रस्तावात अंबाजोगाई शहरासह परिसरातील नागरिकांची रेल्वे प्रवासाची गरज, व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा, दळणवळण आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने नवीन रेल्वे स्थानकाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये घाटनांदूर-श्रीगोंदा या जुन्या मागणीसह परळी-मुरुड, परळी-धाराशिव किंवा बार्शी या पर्यायी रेल्वे मार्गांचीही तांत्रिक व व्यावहारिक मांडणी करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयात प्रत्यक्ष पाठपुराव्याचा निर्धार
प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत पुणे रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठवून रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती डॉ. पतकराव यांनी दिली. दरम्यान, डिसेंबर २०२६ मध्ये स्वतः दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात जाऊन हा प्रस्ताव सादर करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
अंबाजोगाई येथे रेल्वे स्थानक उभारल्यास शहरासह परिसरातील अनेक गावांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होऊन व्यापार, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनासह केंद्र सरकारच्या स्तरावरही या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा केला जाणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!