पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात सामाईक विहिरीचे पाणी काढण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करून लोखंडी कुदळीच्या तुंब्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आण्णासाहेब विलासराव राख (४२, व्यवसाय शेती, रा. थेरला, ता. पाटोदा) यांच्या फिर्यादीनुसार, थेरला शिवारातील नळवाडी येथील सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून वाद झाला. फिर्यादी मोटार सुरू करण्यासाठी गेले असता अशोक सखाराम राख आणि संतोष सखाराम राख यांनी संगनमत करून त्यांना मोटार सुरू करू नका, असे सांगत शिवीगाळ केली.

यावेळी अशोक राख याने लोखंडी कुदळीच्या तुंब्याने फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने दुखापत होऊन रक्तस्राव झाला. संतोष राख याने दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.