पाटोदा शहरातील सांगवी रोडवर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकास कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली असून जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फिर्यादी अंकुश विठ्ठल सोनवणे (वय ४२, रा. जयसिंग नगर, पाटोदा) हे आपल्या रिक्षातून प्रवासी घेऊन जात असताना आरोपी पप्पू शामराव जावळे याने पाठीमागून स्वतःचा रिक्षा आणून त्यांच्या वाहनाला जोरात घासून कट मारला. त्यानंतर खाली उतरून 'माझ्या रिक्षाला तुझा रिक्षा का घासला' असा जाब विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून अंकुश यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार केदार पुढील तपास करत आहेत.