पुणे: महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी राज्यभरात आंदोलनांचा भडका उडालेला पाहायला मिळाला. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पारदर्शकता आणि रखडलेल्या निकालांसाठी शास्त्री रस्त्यावरील अहिल्यादेवी अभ्यासिकेजवळ मोठे आंदोलन छेडले. या आंदोलनस्थळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व मागण्या मान्य न झाल्यास थेट स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा कडक इशारा सरकारला दिला.

मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत पोरांच्या सर्व मागण्या त्यांच्या कानावर घातल्या आहेत. येणाऱ्या परीक्षा 'ऑब्जेक्टिव्ह' पद्धतीनेच होतील आणि पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवून घेऊ, असा शब्द मुंडे यांनी दिला. 'मी इथं फक्त पाहायला नाही, तर तुमच्यासोबत लढायला आलोय, एकदा मैदानात उतरलो की माघार घेणार नाही', असा विश्वास त्यांनी तरुणांना दिला.

एकीकडे पुण्यात विद्यार्थ्यांचा टाहो सुरू असताना, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सोबतच, मुंबईतील शिवाजी पार्कवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीही आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस राज्यात सर्वत्र आंदोलनाचाच ठरला.