केज : सांगली जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील बाबासाहेब गोपीनाथ तोगे (वय ५५) या ऊसतोड मजुराच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ऊसतोडणीच्या ५० हजार रुपयांच्या उचलीच्या वादातून मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट केज पोलीस ठाण्यात आणला होता. याप्रकरणी मयताचा मुलगा सचिन तोगे यांच्या तक्रारीवरून शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) केज पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उचलीच्या पैशावरून मारहाण आणि लूट
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ च्या सुमारास मुंडेवाडी येथील घरामागील शेतात सांगवी (ता. केज) येथील अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार आणि राधाबाई अशोक केदार यांनी बाबासाहेब तोगे यांच्याशी ऊसतोडणीच्या उचलीच्या पैशांवरून हुज्जत घातली. ५० हजार रुपयांची उचल घेऊनही कामावर येत नसल्याचे म्हणत तिघांनी शिवीगाळ करून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच त्यांची टीव्हीएस कंपनीची दुचाकी व मोबाईल जबरदस्तीने पळवून नेला. या घटनेनंतर सांगली येथे ऊसतोडणीसाठी गेलेल्या बाबासाहेब तोगे यांचा दि. १३ नोव्हेंबर रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, केज पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
व्हीसेरा अहवालाकडे लक्ष; आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हीसेरा राखून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊन आरोपींवर अधिक गंभीर कलमांन्वये कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध यापूर्वी २०२५ मध्येही नितीन केदार या व्यक्तीस गंभीर मारहाण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!