मराठवाडा साहित्य परिषद (छत्रपती संभाजीनगर) आणि बनसारोळा येथील बनेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ४६ वे मराठवाडा साहित्य संमेलन १६ व १७ जानेवारी २०२७ रोजी बनसारोळा (ता. केज) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे.

पाहणी दौरा आणि निवड घोषणा

संमेलनाच्या नियोजनाच्या दृष्टीने मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव डॉ. दादा गोरे, उपाध्यक्ष प्रा. आसाराम लोमटे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सहसचिव गणेश मोहिते आणि कार्यकारिणी सदस्य दगडू लोमटे यांनी नुकतीच बनसारोळा येथील संमेलन स्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर झालेल्या विशेष बैठकीत मसापचे उपाध्यक्ष प्रा. आसाराम लोमटे यांनी स्वागताध्यक्षपदासाठी डॉ. नरेंद्र काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यावेळी मसापच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती

या बैठकीस ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब, बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत गोरे, मसाप अंबाजोगाई शाखेचे सचिव गौरव शेंद्रे, मसाप केज शाखेचे सचिव प्रा. नवनाथ काशीद, युवराज काकडे, सूर्यकांत धायगुडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे केज तालुक्यातील साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.