राज्यातील दुष्काळग्रस्त आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या बळीराजाला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत (NDRF) दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांत केंद्राने मोठी वाढ केली असून, आता शेती, फळबागा, पशुधन आणि घरांच्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई मिळणार आहे.
नव्या निकषांनुसार आता जिरायती शेतीसाठी हेक्टरी ११ हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी २२ हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच फळबागांच्या नुकसानीसाठी थेट हेक्टरी ३० हजार रुपये मदत मिळणार आहे. यासोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत ४ लाखांवरून दुप्पट करत ८ लाख रुपये करण्यात आली आहे. जनावरे आणि घरांच्या नुकसानीसाठीच्या मदतीतही घसघशीत वाढ झाली आहे.
हे सुधारित दर २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या काळासाठी लागू राहतील. १ एप्रिल २०२६ नंतर झालेल्या नुकसानीलाही हे दर लागू होण्याची दाट शक्यता असली, तरी त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यापूर्वी मदतीसाठी केंद्राकडे ३१ हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला होता, पण या नव्या निकषांमुळे आता राज्याला पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठवावा लागू शकतो.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!