कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसाठी पात्र व्यक्तींना पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यात १२ ते २० नोव्हेंबरदरम्यान विशेष शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील जुन्या अभिलेखांची सखोल तपासणी करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे.
निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीसाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, विशेष बाब म्हणजे मोडी लिपी वाचक तसेच वंशावळ जुळवण्याच्या कामातील तज्ज्ञांचाही यात समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, जुन्या दस्तावेजांची काळजीपूर्वक तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनीही आपल्याकडील जुने अभिलेख असल्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!