बीड जिल्ह्यातील वडवणी ते सिरसाळा या मुख्य रस्त्यावर खामगावजवळ एका क्लासिक बुलेटचा (MH-28-CG-7034) भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा नाहक बळी गेल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्याचे रखडलेले काम आणि रिफ्लेक्टरच्या अभावामुळे हा जीवघेणा अपघात घडल्याचा थेट आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
या मार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे. रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक नाहीत आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिशा दाखवणारे रिफ्लेक्टर लावले नसल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानेच या बुलेटस्वाराला आपला जीव गमवावा लागला. या भयानक घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित गुत्तेदाराच्या बेजबाबदार कारभाराचे वाभाडे निघत आहेत.
रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. निष्पाप लोकांचे आणखी किती बळी गेल्यानंतर या सुस्त प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त आणि उद्विग्न सवाल आता परिसरातील नागरिक विचारत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!