आष्टी तालुक्यातील पाटसरा परिसरात काही दिवसांपूर्वी घोड्यावर हल्ला करून त्याला ठार करणारा वन्यप्राणी हा वाघ नसून बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात १० नोव्हेंबर रोजी बिबट्याची स्पष्ट छायाचित्रे कैद झाली असून, तो घोड्याच्या मृतदेहावर ताव मारताना दिसत आहे. यामुळे परिसरात वाघाच्या वावराबाबत सुरू असलेल्या अफवा आणि संभ्रमाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

पाटसरा परिसरात घोड्याची शिकार झाल्यानंतर शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. घटनेनंतर वनविभागाने तात्काळ पावले उचलत परिसरात कॅमेरे लावले होते. यात बिबट्याचा वावर स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांची चिंता आणखी वाढली आहे. नागरिकांच्या आणि पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी आणि बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी किंवा शेतात एकट्याने जाणे टाळावे, जंगल परिसरात विनाकारण फिरू नये, तसेच लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. वन्यप्राणी दिसल्यास स्वतः त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.