राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गाच्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, इयत्ता ८ वी आणि ९ वी मधील एकूण ३०० विद्यार्थ्यांना थेट 'इस्रो' (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) येथे शैक्षणिक सहलीसाठी नेले जाणार आहे.
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबद्दल सखोल माहिती मिळावी आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाने या उपक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विशेष अभ्यास दौऱ्यामध्ये १५० मुले आणि १५० मुलींची निवड केली जाणार असून, हे विद्यार्थी बेंगळुरू, तिरुवनंतपुरम आणि कन्याकुमारी येथील इस्रोच्या विविध केंद्रांना भेट देतील.
या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य सरकारने तब्बल ३.८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, यासाठी लवकरच पारदर्शक ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वंचित आणि ग्रामीण घटकातील विद्यार्थ्यांसाठी अंतराळ विज्ञानासारख्या प्रगत क्षेत्रातील यशोगाथा जवळून अनुभवण्याची आणि नवी प्रेरणा मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!