बीड - मस्साजोग (ता. केज) येथील बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालय व वरिष्ठ कार्यालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही अद्याप बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्यात आलेले नाही. या प्रकरणाचे गांभीर्य आणि कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलवावे, अशी आक्रमक मागणी करत खासदार बजरंग सोनवणे यांनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा, पुणे) यांना थेट पत्र पाठवून जाब विचारला आहे.

न्यायालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली

मस्साजोग येथील घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव अन्यत्र हलवण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाने १३ जानेवारी २०२५ रोजी (आदेश क्र. २२०/२०२५) निर्देश दिले होते. त्यापाठोपाठ विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), छत्रपती संभाजीनगर यांनी १४ जानेवारी २०२५ रोजी पत्र काढून सहआरोपी विष्णू चाटे यास लातूर जिल्हा कारागृहात, तर वाल्मीक कराड यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्पष्ट पत्रे असतानाही बीड कारागृह प्रशासनाने या आदेशांची अंमलबजावणी न करता ती जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आहे.

प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा संशय

न्यायालयीन व प्रशासकीय आदेश धाब्यावर बसवून आरोपी वाल्मीक कराडला बीडमधून हलवण्यास टाळाटाळ का केली जात आहे, यामागे नेमकी प्रशासकीय अडचण आहे की कोणाचा राजकीय दबाव, असा संतप्त सवाल खा. सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक कारागृहात ठेवून कोणाकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का, अशी गंभीर शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

तातडीने वर्ग करून सविस्तर अहवाल देण्याची मागणी

कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा धोका टाळण्यासाठी आरोपी वाल्मीक कराड यास कोणत्याही विलंबाविना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात तात्काळ वर्ग करण्यात यावे, अशी आग्रही मागणी खा. सोनवणे यांनी केली आहे. तसेच, आजवर या आदेशांची अंमलबजावणी न करण्यामागे कोणती कारणे होती, याचा सविस्तर लेखी खुलासा व अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी पत्राद्वारे कारागृह महासंचालकांना दिले आहेत.