परळी तालुक्यातील वाका शिवारातील पाण्याच्या खदानीतून अज्ञात चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पाणबुडी मोटारी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विठ्ठल विष्णू मुंढे, संतराम मस्के आणि अशोक मुंढे या तिघांनी आपल्या शेताला पाणी देण्यासाठी खदानीत पाणबुडी मोटारी बसवल्या होत्या. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी साडेसात एचपी आणि पाच एचपीच्या तिन्ही मोटारी लंपास केल्या. सकाळी शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना चोरीचा प्रकार समजला. याप्रकरणी विठ्ठल मुंढे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार देवकाते तपास करत आहेत.