बीड : समनापूर शिवारातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावरील संभाजी चौकातील उड्डाणपुलाखाली तीन अनोळखी व्यक्तींनी एका पानशॉपी चालकाला मारहाण करून त्याच्या पत्नीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे वरवटी येथील आणि सध्या पाली (ता. जि. बीड) येथे वास्तव्यास असलेले संजय राजेंद्र नाटकर (वय २३) हे पानशॉपी चालक आहेत. २२ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ते समनापूर शिवारातील संभाजी चौकातील उड्डाणपुलाखाली असताना तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अंदाजे ४२ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र आणि साडेदहा हजार रुपये किमतीचे दीड ग्रॅम वजनाचे कानातील कुडके व हुजर असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर संजय नाटकर यांनी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघा अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (६) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.