अंबाजोगाई -: स्व . यशवंतराव चव्हाणांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना राबविली. साहित्य, संस्कृती, नाटकं,शेती अश्या सर्व घटकांना न्याय दिला. अशी दूरदृष्टी,भविष्याचा वेध घेणारा सुसंस्कृत नेता पुन्हा झाला नाही. महाराष्ट्राची आब त्यांनी राखली. असे अलौकिक कार्य यशवंतरावांनी केले. असे प्रतिपादन पुणे येथील लेखक, दिग्दर्शक ,अभिनेते डॉ.अतुल पेठे यांनी केले.
अंबाजोगाई येथे गेल्या ४२ वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृति समारोहाचे उद्घाटक म्हणून डॉ.अतुल पेठे बोलत होते.व्यासपिठावर स्मृति समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. अतुल पेठे म्हणाले की, यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री ते उपपंतप्रधान असा राजकीय प्रवास केला. या राजकीय प्रवासात संस्था या देशासाठी पायाभूत असतात. हा विचार त्यांनी मांडला. संगीत, कला, साहित्य, संस्कृती, यांच्या माध्यमातून समाजाचे स्वास्थ्य वेगवेगळ्या अंगाने सुस्थितीत राहते. ही शिकवण समाजासमोर ठेवली. असा भविष्याकडे दीर्घ पल्ल्याची दृष्टी असणारा नेता पुन्हा होणे नाही. अशा शब्दात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना आपल्या विचारातून आदरांजली व्यक्त केली.
पुढे बोलतांना म्हणाले की, आज राष्ट्रात समाज तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. समाजातील शांतता व सलोखा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाने दुरावला जात आहे. भेदाभेद, द्वेष याचाच वापर मोठ्या प्रमाणावर होऊन भाषावाद, प्रांतवाद यांच्या नावावर समाजाचे विघटन केले जात आहे. धर्माधर्मात फारकत केली जात आहे. द्वेषावर आधारित समाजरचना निर्माण होत असल्याने संस्कृती व सामाजिक काम दुरावत चालले आहे. अशा स्थितीत यशवंतरावांचे विचार समाजासाठी दिशादर्शक ठरतात. संक्रमण हे चांगल्या विचारातून होत असते. हा विचार पुढे आला तर राष्ट्राची वाटचाल निश्चितच सुकर होईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील संवाद दिवसेंदिवस दुरावत चालल्याचे त्यांनी सांगितले. समाजाप्रती संवेदना जागृत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अंबाजोगाईत गेल्या ४२ वर्षांपासून यशवंतरावांच्या विचाराचा वारसा अंबाजोगाईकर जोपासतात. याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कविता कराड गित्ते यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा समारोह समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
दीपप्रज्वलन, यशवंतराव चव्हाण व कै. भगवानराव लोमटे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून स्मृति समारोहाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत गिताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दगडू लोमटे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सतीश लोमटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अमृत महाजन यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचलन प्रा. मेघराज पवळे यांनी तर उपस्थितांचे आभार सतीश लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!