बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा हद्दीत एका खाजगी आरएमसी प्लँटवरील सिमेंट मिक्सरमध्ये पडून अमोल मच्छिंद्र जावळे या १६ वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. कामगाराच्या सुरक्षेकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा अपघात घडला असून, घटनेनंतर प्लँटवरील सर्व कर्मचाऱ्यांनी पळ काढल्यामुळे या दुर्दैवी मुलाचा मृतदेह तब्बल सात तास सिमेंटच्या मशिनमध्येच अडकून पडला होता.

अपघाताचा थरार आणि माणुसकीला काळीमा

सोन्नाखोट्टा ते देवळा या रस्त्याच्या कामासाठी बाळराजे कन्स्ट्रक्शनच्या वतीने रुई पिंपळा हद्दीतील सोना फाटा ते खडकी रस्त्यावर आर.एम.सी. प्लँट उभारण्यात आला आहे. खंडोबाचीवाडी (खडकी, ता. वडवणी) येथील अल्पवयीन अमोल जावळे हा या ठिकाणी कामाला होता. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काम करत असताना अमोल अचानक सिमेंट मिक्सरमध्ये पडला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर माणुसकी दाखवत त्याला बाहेर काढण्याऐवजी प्लँटवरील सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून थेट पळ काढला. मिक्सरचा ऑपरेटरही पसार झाल्यामुळे अमोलचा मृतदेह काढता आला नाही आणि तो सलग सात तास मशिनमध्येच पडून राहिला.

वाहनांच्या संशयास्पद वर्दळीमुळे फुटले बिंग

अपघात लपवण्याचा प्रयत्न होत असताना प्लँटवर काही वाहनांची घाईघाईने ये-जा सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने ग्रामस्थांनी थेट प्लँटकडे धाव घेतली, तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलिस उपनिरीक्षक शाम गायकवाड यांच्यासह अंमलदार हनुमंत कप्पे, नवनाथ उगलमुगले, आदिनाथ तांदळे, भास्कर राऊत, आमेर सय्यद आणि विश्वजित मुंडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रात्री नऊ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यावर नातेवाईक ठाम, ग्रामस्थांचा संताप

पोलिस पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया रात्री सुरू झाली. मात्र, जोपर्यंत संबंधित दोषींवर कठोर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका अमोलच्या नातेवाईकांनी घेतली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या धोकादायक प्लँटवर बालकामगाराची नियुक्ती कोणी केली, त्याच्या सुरक्षेचे कोणते उपाय योजले होते, पर्यावरण विभागासह आवश्यक परवानग्या या प्लँटला होत्या का आणि सुरक्षा नियमांचे पालन का झाले नाही, असे अनेक गंभीर सवाल आता ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारले आहेत.