बीड जिल्ह्यात दुष्काळ आणि हंगामामुळे स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्यसेवेत कोणत्याही परिस्थितीत खंड पडू नये, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. बीडमधील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य विभाग आणि पोलिसांना समन्वयाने काम करत अवैध गर्भलिंग निदान रोखण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
ऊसतोड कामगारांसोबत जाणाऱ्या महिलांची ‘आरोग्यसाथी’ म्हणून निवड करून त्यांना ओळखपत्र आणि औषधांचा नियमित पुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले. कामगारांचे आरोग्य कार्ड तयार करून त्यात आवश्यक त्या सर्व तपासण्यांची नोंद करावी. खाजगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांची कारणे तपासावीत आणि अनावश्यक शस्त्रक्रिया टाळण्यासाठी जनजागृती करावी. गर्भाशय शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना मेनोपॉज क्लिनिकशी जोडून त्यांचे समुपदेशन करावे, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी ज्या रस्त्यांवर सोनोग्राफी केंद्रे आहेत तिथे CCTV कॅमेरे बसवण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच पशुवैद्यकीय सोनोग्राफी यंत्रांचा मानवी गर्भलिंग निदानासाठी होणारा गैरवापर आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी आरोग्य आणि पोलीस विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!