परळी तालुक्यातील सिरसाळा येथे भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तब्बल ८६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची मोठी घटना घडली आहे. ही चोरी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आयशा कॉलनी भागात घडली.

सादिक हसनमिया अत्तार हे त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेर गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य गेटचे आणि आतील दाराचे कुलूप तोडले. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दार उचकटून चोरट्यांनी ४२ हजार रुपयांचे १८ मणी असलेले मंगळसूत्र, २८ हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स आणि १६ हजार रुपयांचे चांदीचे दागिने (साखळी, ब्रेसलेट, जोडवे) असा एकूण ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार मुंडे या चोरीचा तपास करत आहेत.