परळी: परळी तालुक्दायातील दादाहरी वडगावचे रहिवासी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण बीडसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मुलाने सांगितले खरे कारण
शिवाजी शिंदे यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांचा मुलगा आशुतोष शिंदे याने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धक्कादायक माहिती दिली आहे. या फिर्यादीनुसार, शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. सध्या पोलीस शिवाजी शिंदे यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत, ज्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दादाहरी वडगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चार महिन्यांपूर्वी झाला होता जीवघेणा हल्ला
शिवाजीराव शिंदे यांच्यावर मे महिन्यात परळी शहरातील त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये एका तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा त्यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!