मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग तीन वेळा विजयी झालेले महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना यंदा पराभवाचा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी त्यांचा दारुण पराभव केला. सलग १८ वर्षांच्या प्रदीर्घ सत्ताकाळानंतर पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश आणि महायुतीतील अंतर्गत बंडखोरी या पराभवाला प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे.

महायुतीतील अंतर्गत गटबाजीचा फटका सतीश चव्हाण यांच्या पराभवामागे महायुतीमधील नेत्यांची उघड नाराजी हे मुख्य कारण मानले जात आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी घेतलेली विरोधाची भूमिका चव्हाणांसाठी नुकसानकारक ठरली. नेत्यांमधील या सुप्त आणि उघड संघर्षाचा थेट फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना मिळाला.

पदवीधरांचा रोष आणि बदलाची लाट सलग तीन टर्म आमदार असूनही सुशिक्षित बेरोजगार, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि नोकरदारांच्या समस्या सोडवण्यात सतीश चव्हाण कमी पडल्याची भावना मतदारांमध्ये होती. पुणे येथील पदवीधरांच्या आंदोलनाकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष त्यांच्या अंगलट आले. केवळ तगडी प्रचार यंत्रणा, सत्तेचा पैसा आणि मोठ्या नेत्यांचा फौजफाटा असूनही मतदारांशी तुटलेला संवाद या निकालातून अधोरेखित झाला. मतदारांनी प्रस्थापित नेतृत्वाला नाकारत डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या रूपाने बदलाचा पर्याय निवडला. या निकालाने सत्तेचा अहंकार मतपेटीत चालत नाही, हा स्पष्ट संदेश दिला आहे.