गेवराई: रात्रीच्या वेळी घराबाहेर कुठे जात आहेस, अशी विचारणा केल्याच्या रागातून पत्नीने स्वतःच्या पतीला लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडु गेमा राठोड (वय ६८, रा. जयराम नाईक तांडा पाचेगाव, ता. गेवराई) असे मारहाण झालेल्या फिर्यादी पतीचे नाव आहे. तर सखुबाई बंडु राठोड (वय ५८) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पत्नीचे नाव आहे. सखुबाई आणि तिचा मुलगा हे गेल्या बारा वर्षांपासून बंडु राठोड यांच्या घराशेजारीच वेगळे शेड बांधून राहतात. दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बंडु राठोड घराबाहेर आले असता, त्यांना सखुबाई शेडला कुलूप लावून कुठेतरी जात असल्याचे दिसले. एवढ्या रात्री कुठे चालली आहेस, अशी विचारणा त्यांनी केली.

या विचारणेचा राग आल्याने सखुबाईने शिवीगाळ करत जवळच पडलेला लोखंडी गज उचलला आणि बंडु राठोड यांच्या पाठीवर, हातावर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. आरडाओरडा ऐकून पुतण्या बाळू राठोड याने मध्यस्थी करत भांडण सोडवले.

गेवराई येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण जायभाये हे करीत आहेत.