गेवराई: वसतिगृहातील शिक्षकाच्या सततच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अवघ्या १३ वर्षांच्या निष्पाप शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका वसतिगृहात घडली. समर्थ आबासाहेब खरात (वय १३, रा. कवडगाव, ता. गेवराई) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या प्रकरणी मृत बालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित शिक्षकाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाचाला कंटाळून संपवले आयुष्य
समर्थ खरात हा पाथर्डी येथील 'हिंद वसतिगृहात' राहून इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता, तर त्याचा लहान भाऊ साई याच ठिकाणी पाचवीच्या वर्गात शिकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील शिक्षक सुभाष घुगे हे गेल्या काही दिवसांपासून समर्थला सातत्याने अकारण त्रास देत होते. समर्थने या जाचाबाबत आपल्या वडिलांकडे व्यथाही मांडली होती. मात्र हा मानसिक छळ असह्य झाल्याने समर्थने बुधवारी दुपारी वसतिगृहाच्या खोलीतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
नातेवाईकांचा ठिय्या व संताप
या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच संतप्त नातेवाईकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले आणि आरोपी शिक्षकावर तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी लावून धरली. स्थानिक स्तरावर निष्पक्ष तपास होण्याबाबत साशंकता उपस्थित करत नातेवाईकांनी पाथर्डी येथे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे समर्थचा मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे निवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!