केज :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामात १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी केज तालुक्यातील नांदूरघाटच्या सरपंच श्रीमती सुनीता युवराज जाधव यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अन्वये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच, अपहाराची रक्कम व्याजासह वसूल करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
कामांतील अनियमितता आणि अपहाराचा तपशील
नांदूरघाट ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर २६ रस्ते कामांपैकी १३ कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) गायब असल्याचे तपासणीत उघड झाले. यातील ८ रस्त्यांवर कोणतेही काम न करताच ५९ लाख ४६ हजार ४१३ रुपयांची अकुशल व कुशल मजुरी उचलली गेली. तसेच, उर्वरित १२ रस्त्यांच्या कामांवर वितरित निधी आणि प्रत्यक्ष खर्च यात ४४ लाख ४३ हजार ६७ रुपयांची तफावत आढळली. एकूण १ कोटी ३ लाख ८९ हजार ४८० रुपयांचा निधी लाटल्याचे निष्पन्न झाले आहे.
बँकेत रक्कम भरल्याने गुन्हा सिद्ध
सुनावणीदरम्यान सरपंच सुनीता जाधव यांनी अपहाराच्या रकमेपैकी ३३ लाख १५ हजार १४७ रुपये बँकेत जमा केले होते. ही रक्कम भरणा केल्यामुळे त्यांनी अपहार मान्य केल्याचे स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवत विभागीय आयुक्तांनी त्यांना कर्तव्यात कसूर व सार्वजनिक निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली पदावरून अपात्र घोषित केले.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
या प्रकरणात तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आणि शाखा अभियंता यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार तात्काळ निलंबनाची कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, जबाबदार ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी आणि सीडीईओ यांच्याविरुद्ध प्रस्तावित शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोषींकडून अपहाराची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करून शासनखाती जमा करावी व संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!