केज :- केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे विहिरीत पडलेला मोबाईल काढून, दोरीला धरून वर येताना विहिरीत पडून शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

       लाडेवडगाव येथील शेतकरी रतन रामराव घुगे (वय ६०) हे गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विहिरीतील पाणी पातळी डोकावून पाहत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल विहिरीत पडला. तो मोबाईल काढण्यासाठी ते विहिरीत उतरले होते. मोबाईल घेऊन ते दोरीला धरून विहिरी बाहेर येत असताना तोल सुटल्याने ते विहिरीत पडले. विहिरीत पडल्याने जखमी झाल्याने त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच इंदूबाई पंढरी शेप यांचे पुत्र डॉ. सचिन शेप यांनी दिली. 

पाण्यासाठीचे राहुल शिंदे यांचे उपोषण मागे

लाडेवडगाव येथे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. दलितवस्तीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा. मागासवर्गीय मजुरांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा. जलजीवन पाणी पुरवठा योजनेचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करावे. या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे व इतर नागरिक दोन दिवस अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी उपोषणस्थळी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना वित्त आयोगाच्या निधीतून बोअर घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राहुल शिंदे व इतर नागरिकांनी बुधवारी रात्री उपोषण मागे घेतले होते. 

पाच बोअर अधिग्रहणामुळे टँकर मंजूर नाही

गावातील पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने गावात पाच बोअर अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव टंचाई विभागाकडे सादर केला होता; मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी केली असता अधिग्रहण केलेल्या बोअरला पाणी असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आणखी टँकर मंजूर झालेले नाही. 

- अश्विनी खुणे, ग्रामपंचायत अधिकारी, लाडेवडगाव